॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
१७ व्या शतकातील श्रीराम मंदिर देवस्थान, रत्नागिरी
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर हे एक पुरातन, जाज्वल्य व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. अनेक भाविकांनी या देवस्थानाची दिव्य अनुभूती घेतल्याचे सांगितले असून, हे नवसाला पावणारे देवस्थान असल्याची भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
रत्नागिरीतील श्रीराम मंदिर देवस्थान शिवकालापासून अस्तित्वात असल्याचे उल्लेख जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. संस्थानच्या दफ्तरखान्यातील मोडी लिपीतील दस्तऐवजांमध्ये या देवस्थानाचा उल्लेख सापडतो. मराठशाही काळात देवस्थानांना संस्थानिकांचे आर्थिक पाठबळ लाभत असे. त्यानुसार बडोदे येथील संस्थानिक श्रीमंत गायकवाड महाराजांकडून या देवस्थानास अनेक वर्षे ‘वर्षासन’ मिळत होते.
असे हे १७ व्या शतकातील, सुमारे ३०० वर्षांचे ऐतिहासिक देवस्थान असून, याचा प्रथम जिर्णोद्धार सन १९३६ मध्ये व दुसरा जिर्णोद्धार सन २०११ मध्ये संपन्न झाला.
वर्षांचे देवस्थान
प्रथम जिर्णोद्धार
द्वितीय जिर्णोद्धार
व्या शतकातील देवस्थान
संगमरवरी वास्तुशिल्प व रामदरबार
रत्नागिरी शहराच्या गावठाण भागात वसलेले श्रीराम मंदिर हे रत्नागिरीतील एकमेव देवस्थान असून, संपूर्ण कोकणातील एकमेव संगमरवरी मंदिर म्हणून याची विशेष ओळख आहे. मंदिराच्या भव्यतेमुळे व शांत आध्यात्मिक वातावरणामुळे भाविकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने येथे भेट देतात.
या मंदिराचे संपूर्ण बांधकाम उत्कृष्ट संगमरवरात करण्यात आले असून, त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलात्मक आहे. मंदिरात जयपूर येथील जगप्रसिद्ध शिल्पकारांनी घडवलेला ‘रामदरबार’ स्थानापन्न आहे. प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण व श्रीहनुमान यांच्या मूर्ती राजबिंडच्या, लोभसवाण्या व सजीव भासणाऱ्या आहेत
देवस्थानची खास वैशिष्ट्ये
प्राणप्रतिष्ठा व वेदोक्त कलशारोहण
नूतन श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय व वेदशास्त्रसंमत पद्धतीने संपन्न झाला. प.पू. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते दिनांक ७ मार्च २०११ रोजी हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार पडला. याच प्रसंगी नूतन मंदिर प्रासादाचा शुभारंभ श्रीमंत राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते झाला.
या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा विधी चारही वेदांनुसार व पूर्णपणे “वेदोक्त” पद्धतीने पार पाडण्यात आला. विविध ज्ञातींच्या यजमानांच्या हस्ते यज्ञ, होम व धार्मिक विधी करण्यात आले. या सोहळ्यासाठी भारताच्या चारही पिठांतील चतुर्वेदांमध्ये पारंगत ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चारही वेदांनुसार, वेदोक्त पद्धतीने संपन्न झालेला हा सोहळा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पहिला व एकमेव असल्याचा मान मिळवणारा ठरला. या विधीमुळे श्रीराम मंदिराला आध्यात्मिक तेज प्राप्त झाले असून अनेक भाविकांनी येथे दैवी अनुभूती आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे देवस्थान जागृत व नवसाला पावणारे असल्याची भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
देवस्थान संकुलातील स्वतंत्र मंदिरे
श्री देवी तुळजाभवानी
तुळजापूर
श्री देव विठ्ठल-रखुमाई
पंढरपूर
श्री देव दत्तगुरु
नरसोबाची वाडीया श्रीराम मंदिर देवस्थान संकुलाचे प्रांगणात श्री देवी तुळजाभवानी, श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देव दत्तगुरू या देवतांची देखील मंदिरे उभारण्यात आली. ही मंदिरे बन्सी पहाडपूर, राजस्थान येथून आणलेल्या गुलाबी रंगाच्या संगमरवरात उभारण्यात आली असून या ३ मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा प. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या शुभ हस्ते दि. १३ डिसें. २०१३ रोजी संपन्न झाला.
सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम
सामाजिक उपक्रम
श्रीराम मंदिरामध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टा, भजन महासंघ आणि योगा महासंघ वर्षभर विविध मार्गदर्शन व सेवाभावी कार्यक्रम चालवतात. रामनवमी व प्रत्येक बुधवार भाविकांना ‘महाप्रसाद’ दिला जातो.
सांस्कृतिक कार्यक्रम
वर्षभर विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, जसे की मंगळागौर, झिम्मा फुगडी, रांगोळी, पाककला, फॅन्सी ड्रेस, दांडीया आणि संगीत मेळे.
पारंपारिक उत्सव
विजयादशमीला पारंपारिक “राजेशाही दसरा” आणि कोजागिरी पौर्णिमेला कवीजनांसाठी “काव्य मैफल” आयोजित केली जाते.
आरोग्य व बालकल्याण
वर्षभर आरोग्य शिबिरे, नेत्र शिबिरे आणि मोफत उपचार शिबिरे आयोजित केले जातात. लहान मुलांसाठी ‘बाल आनंद मेळावा’ आणि नियमित भजन सेवा.